Type Here to Get Search Results !

🔴LIVE TV

बोपाबोडी गावातील दोन बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश..........NN81


डुग्गीपार पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधिक्षक गोरख भामरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांचे नेतृत्वात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, दामिनी पथक आणि डुग्गीपार पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने दि.29 मे 2026 रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील बोपाबोडी गावात नियोजित करण्यात आलेले 02 बालविवाह वेळीच हस्तक्षेप केल्याने होणारे बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. 

          डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. निर्वाण आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी मुकेश पटले यांनी स्थानिक पातळीवर माहिती गोळा करुन प्रशासनाला वेळीच सतर्क केले.

          बोपाबोडी येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांचेकडुन अल्पवयीन बालकांचे वयाचे पुरावे प्राप्त करुन घेण्यात आले. प्राप्त कागदपत्रांच्या अनुषंगाने दोन्ही बालकांचे वय बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार कमी असल्याचे दिसुन आले. बाल कल्याण समितीच्या सदस्य जयश्री कापगते आणि समुपदेशक पुजा डोंगरे यांनी होऊ घातलेल्या बालविवाहातील दोन्ही कुटुंबियांशी संवाद साधुन समजुत काढली व मुला-मुलींच्या शिक्षणासाठी समुपदेशन करण्यात मोलाची भुमिका बजावली.

           सदर पथकाने विवाहस्थळी पोहोचुन वर-वधु पक्षाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत बोपाबोडी येथे बोलावुन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आंगणवाडी सेविका, आशावर्कर आणि ग्राम बाल संरक्षण समितीचे इतर सदस्य यांच्या समक्ष बालविवाहाचे दुष्परिणाम व कायदेशिर शिक्षेची तरतुद समजावून सांगितले. मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे लेखी हमीपत्र पालकांकडून लिहुन घेण्यात आले.

           दामिनी पथक, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीसारख्या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी झाली. जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी बालविवाह रोखण्यास प्रशासनाला माहिती द्यावी. बालकांचे बालपण वाचविणे हे आपले सामुहिक कर्तव्य आहे. बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात आपला संकल्प अभियान सुरु आहे. प्रशासनासोबत राहुन बालविवाह मुक्त गोंदिया घडविण्यासाठी प्रयत्नशिल राहावे.

जिल्हा बाल संरक्षण कक्ष, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी व बोपाबोडी ग्रामपंचायत आणि आशावर्कर यांच्या संयुक्त देखरेखीखाली मुलांचा पाठपुरावा केला जाणार आहे. बोपाबोडी येथील बालविवाह थांबविण्याच्या कार्यवाहीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी रविंद्र टेभुर्णे क्षेत्रीय कार्यकर्ता धर्मेंद्र भेलावे, ISWS चे कुथेकर, दामिनी पथकाची संपूर्ण टिम उपस्थित होते.

            जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. कायदा मोडणाऱ्या, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, पालक, नातेवाईक, भटजी, मंगल कार्यालय मालक, बालविवाहाला उपस्थित असणारे वऱ्हाडी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक 1098, पोलीस विभाग टोल फ्री क्रमांक 112 किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जवळचे पोलीस स्टेशन, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी येथे तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गोंदिया यांनी केले आहे.

   *सऺवाददाता*

 मुमताज अली सैय्यद

 गोदिया

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Advertisement

#codes