ग्रामीण महिलांना उद्योजकतेसाठी कर्ज, प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची हमी*
साखळी: 28 एप्रिल 2026: गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान, ग्रामीण विकास विभाग, गोवा शासन तसेच भागीदार बँका आणि वित्तीय संस्थांच्या सहकार्याने नावेली ग्रामपंचायत येथे ‘महा लोन मेळावा’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी सुरभी सीएलएफने पुढाकार घेतला.
कार्यक्रमास मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, उर्वी नाईक (सुरभी सीएलएफ), जोत्स्ना चोडणेकर, नावेलीचे सरपंच नारायण गावस, उपसरपंच कल्पना गावस तसेच कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांची कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा लक्षात घेऊन बँका त्यांना सहजतेने कर्ज उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. टेलरिंग, मसाला निर्मिती, स्वीट डिश तयार करणे यांसारख्या कौशल्यांवर आधारित उद्योग महिलांनी उभारावेत, तसेच योग्य ब्रँडिंग व पॅकेजिंग केल्यास अधिक नफा मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
डेअरी फार्मिंग हा सध्याच्या काळात फायदेशीर व्यवसाय असून त्यासाठी मेहनत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. गोव्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात बाहेरून आयात केला जात असल्याने महिलांनी भाजी लागवडीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.
बँकांकडून तांत्रिक सहाय्य मिळणार असून, महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम सरकारकडून केले जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
हा महा लोन मेळावा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.
