नासिक महाराष्ट्र
संवाददाता : नवनाथ आव्हाड
ऋचा संस्थेअंतर्गत स्मार्टपूर प्रकल्पाच्या वार्षिक कामकाजाचा आढावा आणि क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन गुरुवार, दि. 16 जुलै 2026 रोजी नाशिक जिल्हा परिषद येथे करण्यात आले. या कार्यशाळेला ऋचा संस्थेचे चेअरमन व सीईओ निखिल पंत, डायरेक्टर – प्रोग्राम अँड पार्टनरशिप्स मुदित पंत तसेच हेड – सीएसआर प्रोग्राम्स शहजाद नागरा यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्य प्रकल्प प्रमुख हरीश वैद्य यांनी प्रास्ताविक करत स्मार्टपूर प्रकल्पांतर्गत वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला. शासकीय योजनांचा लाभ, शिक्षण, उपजीविका, आर्थिक साक्षरता, डिजिटल सेवा आदी क्षेत्रांत प्रकल्पाने केलेल्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमात आमदार हिरामण खोसकर, ग्रामपंचायत व पंचायतराज विभागाचे प्रशांत पवार, स्किल डेव्हलपमेंट विभागाचे मिलिंद देशपांडे व सुनिता राणी, पशुसंवर्धन विभागाच्या वैशाली थोरात, एमएसआरएलएमचे श्रीकांत सूर्यवंशी व प्रशांत डावरे, आरसेटीचे राजेंद्र पवार तसेच जिल्हा अग्रणी बँकेच्या आर्थिक साक्षरता सल्लागार अनुराधा लोंढे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कौशल्य विकास, पशुसंवर्धन, महिला बचत गट, बँक कर्ज, उद्योजकता व प्रशिक्षण यासंदर्भात उपस्थितांना उपयुक्त माहिती देण्यात आली.
स्मार्टपूर सेंटरचे केंद्र चालक समाधान भगत, नंदराज जाधव, संगणक प्रशिक्षक संतोष शेणे आणि समुदाय संघटक वनिता बोरसे यांनी प्रकल्पामुळे गावांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. तसेच स्मार्टपूर सेंटर समितीचे अध्यक्ष संतु साबळे (अडसरे बुद्रुक), ग्रामविकास अधिकारी सुखदेव गांगुर्डे (वाघेरे), सदस्य दत्तू नवाळे (चिंचोली), निवृत्ती शिरसाठ (कावनई) तसेच लाभार्थी उत्तम गायकर (वाघेरे), तानाजी सोनवणे (सांजेगाव) आणि दिनकर इदे (काळूस्ते) यांनी स्मार्टपूर केंद्रामुळे गावकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यातून झालेल्या लाभांविषयी अनुभव मांडले.
गावातच ऑनलाइन सेवा, मोफत संगणक प्रशिक्षण, बँकिंग सुविधा तसेच उपजीविका प्रशिक्षण उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
कार्यशाळेस सरपंच, स्मार्टपूर समितीचे अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी, समिती सदस्य, लाभार्थी, ऋचा संस्थेचे प्रकल्प सुपरवायझर, समुदाय संघटक, संगणक प्रशिक्षक आणि स्मार्टपूर केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून ग्रामीण भागातील डिजिटल सक्षमीकरण आणि स्वावलंबनाला चालना देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

