सऺवाददाता : मुमताज अली सैय्यद
गोंदिया, दि. 11: आमगाव तालुक्यातील केलसर येथे “समृद्ध CLF गट” मार्फत सेंद्रिय भाजीपाला व रोपवाटिका प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना व शेतकऱ्यांना रोजगार आणि उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. “सूक्ष्म प्रकल्प सन 2024-25” अंतर्गत सुमारे 45 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाने अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या प्रकल्पाची दररोज 2 टन उत्पादनाची क्षमता असून, एकूण 180 सदस्य या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. रोपवाटिकेसाठी 4.5 एकर तर भाजीपाल्यासाठी तब्बल 45 एकर क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनावर भर देण्यात आल्याने बाजारात या उत्पादनांना चांगली मागणी मिळत आहे.
या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती झाली असून, सुमारे 500 कुटुंबांना या उपक्रमातून उपजीविकेचा आधार मिळाला आहे. महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून चालणाऱ्या या प्रकल्पामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही मोठी चालना मिळाली आहे.
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आरोग्यदायी अन्ननिर्मिती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीचा मार्ग या प्रकल्पातून पुढे येत आहे. भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

